नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिल्लीतील लुटियन्स झोनमध्ये असलेला बंगला भाजपचे राष्ट्रीय माध्यम प्रमुख आणि राज्यसभा खासदार अनिल बलुनी यांना दिला आहे. या बंगल्यात सध्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचं वास्तव्य आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या एक अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.


अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'अनिल बलुनी यांच्या विनंतीनंतर त्यांना प्रियांका गांधी यांचा बंगला देण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांनी हा बंगला रिकाम्या केल्यानंतर अनिल बलुनी यांना बंगल्याचा ताबा मिळेल.


01 ऑगस्टपर्यंत प्रियांका गांधींना बंगला रिकामा करावा लागणार
मंत्रालयाने 1 जुलै रोजी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या बंगल्याचं आवंटन रद्द केलं होतं. एसपीजी सुरक्षा काढल्याने त्यांना या निवासस्थानाची सुविधा मिळू शकणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. मोदी सरकारने प्रियांका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत सध्याचं '35 लोधी इस्टेट' हे निवासस्थान रिकामं करण्यास सांगितलं आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार अनिल बलुनी यांनी प्रकृतीच्या आधारावर बंगला बदलण्याची विनंती केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार झाले होते. "आता माझी प्रकृती ठीक आहे. परंतु मला काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्याचं निवासस्थान माझ्यासाठी पूर्णत: योग्य नाही," असं अनिल बलुनी यांनी सांगितलं.


दरम्यान केंद्र सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा कमी करुन त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा पुरवली होती.


1997 मध्ये प्रियांका गांधींना बंगला मिळाला होता
हा बंगला प्रियांका गांधी यांना 21 फेब्रुवारी, 1997 रोजी मिळाला होता, कारण त्यांना त्यावेळी एसपीजी सुरक्षा मिळाली होती, अशी माहिती मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिली. झेड-प्लस श्रेणीच्या सुरक्षेत अशाप्रकारच्या सुविधेची तरतूद नसते, त्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागणार आहे, असंही अधिकाऱ्याने सांगितलं.