नवी दिल्ली : दिल्लीतील एक ढोंगी बाबा सत्संगच्या नावाखाली महिला भक्तांवर बलात्कार आणि ब्लॅकमेल करत असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये राहणारी एक महिला आणि तिच्या मुलीचं लैंगिक शोषण करुन ब्लॅकमेल केल्याचं उघड झालं आहे. पीडितेने तक्रार केल्यानंतर ढोंगी बाबा रजनीश ग्रोव्हर उर्फ अशोक कुमार याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

पीडित तरुणी रजनीश ग्रोव्हरच्या पापांना समोर आणण्याचं ठरवल्यानंतर त्याने तिला धमकी दिली. मात्र, पीडित तरुणीने तरीही धाडस दाखवलं आणि पोलिसांसमोर सर्व प्रकार सांगितला. पीडित तरुणीच्या माहितीनुसार, रजनीश फोटोंच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करुन आपल्या आश्रमात बोलवत असे. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी रजनीश महिलांवर दबाव आणत असे. जवळापास 6-7 महिला त्याला यासाठी साथ देतात.
 

पोलिसांच्या माहितीनुसार, रजनीश ग्रोव्हर दिल्लीचा राहणारा असून, तो स्वत:ला देवाचा अवतार मानतो. दिल्लीतल्या छतरपूरमध्ये त्याचं फार्म आहे. तिथे सत्संगच्या बहाण्याने महिलांवर बलात्कार करतो.
 

जयपूरमध्ये एका शोरुमच्या उद्घाटनाला आला असताना रजनीशने एका तरुणीवर बलात्कार केला आणि फोटोही काढले. तरुणीच्या आईचेही आक्षेपार्ह फोटो काढले. त्यानंतर दोघींना ब्लॅकमेल करुन लैंगिक शोषण करत असे.

 

अखेर तरुणीच्या धाडसानंतर ढोंगी बाबाचे कृत्य जगासमोर आले आहे.