Priyanka Gandhi On Pahalgam Terror Attack नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला (Pahalgam Terror Attack) करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेत दिली. लोकसभेत कालपासून ऑपरेशन सिंदूरवर (Opration Sindhoor) चर्चा सुरु आहे. आज चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी अमित शाह यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या सुलेमान, जिब्रान आणि अफझल या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं सांगितलं. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. 

आपल्या भाषणादरम्यान अमित शाहांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर देखील आरोप केले. पंडित जवाहरलाल नेहरुंनी एकतर्फी शस्त्रसंधी केल्याने आज पाकव्याप्त काश्मीर असल्याचा हल्लाबोल अमित शाहांनी केला. तसेच इंदिरा गांधींनी 1972 मध्ये पीओके परत घेण्याची संधी गमावल्याचा आरोपही अमित शाह यांनी केला. दरम्यान, अमित शाह यांच्या भाषणानंतर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी भाषण केलं. यावेळी सरकारने सर्व सांगितलं, इतिहासही सांगितला, पण एक गोष्ट राहिली, पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला? हा प्रश्न अजूनही सतावत आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. प्रियंका गांधींच्या या प्रश्नानंतर संपूर्ण सभागृह शांत झाल्याचं पाहायला मिळालं. 

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले- प्रियंका गांधी

प्रियांका गांधी यांनी शुभम द्विवेदी यांच्या पत्नीचा उल्लेख करून म्हटले की, लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते. पण सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर  सोडले. हल्ल्याला कोण जबाबदार आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी संरक्षणमंत्र्यांची नाही का, ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी केला. सरकारची अशी कोणतीही यंत्रणा नाही ज्याला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची कल्पना आहे. हे एजन्सींचे अपयश आहे की नाही?, हे मोठे अपयश आहे, अशी टीका प्रियंका गांधींनी केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले, युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबले. हे थांबवण्याची घोषणा आपल्या सरकार किंवा सैन्याने केली नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हे आपल्या पंतप्रधानांच्या बेजबाबदारपणाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. आज देशाला पोकळ भाषणे ऐकायची नाहीत, त्यांना सर्वकाही जाणून घ्यायचे आहे. 22 एप्रिल रोजी काय घडले हे जाणून घ्यायचे आहे, परंतु तुम्ही (सत्ताधारी पक्ष) स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहात, असं प्रियंका गांधींनी सांगितले. 

संबंधित बातमी:

22 मेपासून ट्रेस, सिग्नल मिळताच ठोकलं; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कसं घेरलं?, अमित शाहांनी सगळं सांगितलं!