Amit Shah On Opration Sindhoor नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये ठार करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेत याबाबत माहिती दिली. लोकसभेत काल आणि आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. यावेळी अमित शाह यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचं सांगितले.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पहलगाममध्ये पर्यटकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारण्यात आले. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सैन्याने ही कारवाई केली. दहशतवाद्यांकडून तीन रायफल जप्त करण्यात आल्या. सुलेमान, जिब्रान आणि अफझल हे दहशतवादी मारले गेले. पहलगाममध्ये ज्या रायफलने हल्ला करण्यात आला होता, त्याही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
दहशतवाद्यांची ओळख पटवली-
दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याच तीन दहशवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन आरोपींनीही त्यांची ओळख पटवली आहे. आज (29 जुलै) पहाटे 4 वाजता दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोन जणांना देखील अटक करण्यात आली आहे.
सीसीएस बैठकीत नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले- अमित शाह
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतर मी त्याच दिवशी श्रीनगरला निघालो. पंतप्रधान मोदींनी 23 आणि 24 एप्रिल रोजी सीसीएस बैठक घेतली. यामध्ये सिंधू नदीचा करार पुढे ढकलण्यात आला. तसेच या बैठकीत दहशतवादी जिकडे कुठे लपून बसले असतील त्यांना आणि दहशवाद्यांना मदत करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असं ठरवण्यात आले. 30 एप्रिल रोजी झालेल्या सीसीएस बैठकीत नरेंद्र मोदींनी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले आणि नऊ दहशतवादी अड्डे पूर्णपणे नष्ट करण्यात आले, अशी अमित शाह यांनी माहिती दिली.
22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत झाला होता हल्ला
22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. पहलगामपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन घाटीमध्ये तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. दहशतवाद्यांनी लोकांची धार्मिक ओळख विचारून पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले होते.