नवी दिल्ली : 2017 या नव्या वर्षाची सुरुवातच निवडणुकांचं बिगुल वाजून झाली. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती झाल्याने निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे युती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांनी.


प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याने अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे. येत्या काळात प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात उतरतील, ही त्यापैकीच एक चर्चा.

प्रियांका गांधी यांचा काँग्रेस पक्षातील वाढता सक्रीय सहभाग पाहून, असे म्हटले जाते आहे की, 2019 साली रायबरेलीतून सोनिया गांधी यांच्या ऐवजी प्रियांका गांधी लढण्याची शक्यता आहे.

इंग्रजी वृत्तपत्र ‘द टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, प्रकृती ठीक नसल्याने राजकारणातून काढता पाय घ्यावा, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितलं जातं आहे. त्यामुळ येत्या काळात सगळ्यांची नजर प्रियांका यांच्याकडे लागली आहे. कारण सोनिया गांधी यांच्या जागी प्रियांका गांधी रायबरेलीतून लढण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनीही एका ट्वीटमधून सांगितले होते की, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती होण्यासाठी प्रियांका गांधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे चर्चांना एकप्रकारे दुजोराच मिळाला आहे.

आता उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना कोणती जबाबदारी देतं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.