नवी दिल्ली : काँग्रेस मुख्यालयात नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नावाची पाटी अखेर लागली आहे. राहुल गांधी उपाध्यक्ष असताना त्यांच्यासाठी जो कक्ष होता तोच प्रियांका गांधी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे महासचिव असल्या तरी त्या इतर महासचिव यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत हे स्पष्ट होतं. दिल्लीतील 24 अकबर रोड इथे काँग्रेसचं मुख्यालय आहे. यात प्रियांका गांधींसाठी कक्ष मिळाला असून बाहेर त्यांच्या नावाची पाटीही लावली आहे. प्रियांका गांधी यांचा कक्ष भाऊ आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अगदी शेजारीच आहे. एवढंच नाही तर प्रियांका यांच्या नावापुढे 'वाड्रा' लिहिलं आहे हेही विशेष. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये ही पाटी आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे पूर्व यूपीच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांच्या भूमिकेवर राहुल गांधी चर्चा करणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा सोमवारी परदेशातून परतल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानी भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीसांची तसंच विविध राज्यांच्या प्रभारींची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रियांका सहभागी होणार आहे. प्रियांका यांनी काँग्रेसच्या इतर नेत्यांची भेट घेऊन पूर्व यूपीसाठी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केल्याचं समजतं.