नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा बदल केला आहे. प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. तसंच प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्त्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.


प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत. या निर्णयामुळे इतके दिवस पडद्यामागे काम करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच संघटनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. तसंच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची यावेळी निवडणूक लढण्याची शक्यता कमी असल्याने प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का अशीही चर्चा रंगू लागली आहे


मागील अनेक वर्षांपासून प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश करावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत होते. ती मागणी आज पूर्ण झाली आहे. प्रियांका गांधी आतापर्यंत रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघातच मर्यादित होत्या. त्या केवळ आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांच्या प्रचारात दिसत होत्या. मात्र आता त्या अधिकृतरित्या पक्षात सक्रीय होणार आहेत.

2019 ची लोकसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे आणि त्यात उत्तर प्रदेशची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपाने एकत्र येत, काँग्रेसला आघाडीतून बाहेर ठेवल्याने सगळं समीकरण बदललं आहे.

यानंतर राहुल गांधींनी दावा केला होता की, "जनता आता काँग्रेसला फार मनावर घेत नाही, पण 2019 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देईल." राज्यातील सर्व 80 लोकसभा जागांवर स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली होती.

काँग्रेस उत्तर प्रदेशात पूर्ण जोर लावून निवडणूक लढवणार आहे. प्रियांका पक्षात आल्याचा परिणाम संपूर्ण उत्तर प्रदेशात दिसेल. प्रियांका गांधींना उत्तर प्रदेश पूर्व जबाबदारी दिली असली तरी त्याचा परिणाम पूर्ण यूपीवर पडेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांनी सांगितलं.