नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रियांका गांधी यांनी राजकारणात अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रियांका गांधींची काँग्रेस सरचिटणीस म्हणून नियुक्ती केल्यानंतर आता प्रियांका गांधी कोणत्या लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढणार याबाबत चर्चा होऊ लागली आहे. प्रियांका गांधी या सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. रायबरेली हा काँग्रेसचा गड आहे.

सक्रिय राजकारणात येण्याआधी प्रियांका रायबरेली आणि अमेठीमधील स्थानिक राजकारणात सहभागी होत्या. यापूर्वी प्रियांका रायबरेली आणि अमेठीमध्ये आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल गांधी यांचा प्रचार करताना पहायला मिळत होत्या. या दोन मतदार संघात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टीतर्फे उमेदवार उभा केला जाणार नाही. असे दोन्ही पक्षांनी अगोदरच जाहीर केले आहे. अमेठी हा राहुल गांधींचा मतदार संघ आहे. त्यामुळे प्रियांका रायबरेलीमधून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रियांका गांधींच्या रायबरेली येथून निवडणूक लढण्याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच "प्रियांका लोकसभा निवडणूक लढणार कि नाही, हे ती स्वतः ठरवेल", असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. तसेच 4 फेब्रुवारीपासून प्रियांका पूर्व उत्तर प्रदेशचा ताबा घेणार आहेत. त्यासाठी राजधानी नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. परंतु हा कार्यक्रम आता लखनौ येथे होणार असल्याची माहिती काँग्रेसकडून मिळाली आहे.

राहुल गांधी म्हणाले की, प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी काम करणार आहे. आमचा पक्ष आता पूर्ण ताकदीनिशी आगामी निवडणूक लढणार आहे. दरम्यान प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेशात सर्वत्र प्रियांका गांधींचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वत्र त्यांची दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी तुलना केली जात आहे.