इस्रोच्या पीएसएलव्ही-सी 44 रॉकेटने गुरुवारी रात्री 11.37 वाजता श्रीहरीकोटा येथून भारतीय लष्कराचा उपग्रह मायक्रोसॅट-आर आणि इस्रोच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला उपग्रह कलामसॅटला घेऊन अंतराळात उड्डाण केले. त्यानंतर ठरलेल्या वेळेत पीएसएलव्ही-सी 44 रॉकेटने लष्कराच्या उपग्रहाला त्याच्या कक्षेत प्रस्थापित केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलामसॅट या उपग्रहालादेखील यशस्वीपणे ठरावीक कक्षेत सोडले. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) रॉकेटचे हे 46 वे उड्डाण होते. इस्रोने या उपग्रहांचे लॉन्चिंग मोफत केले आहे. पहिल्यांदा इस्रोने एखाद्या भारतीय संस्थेचा उपग्रह लॉन्च केला आहे. याआधी इस्रोने स्वतःच्या, तसेच इतर देशांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे.