मुंबई : पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर कठोरपणे टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपतल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अराजकीय मंचाची स्थापना करण्याचा निर्णय झाल्याचे भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी सांगितले.


देशभरात एकीकडे तिसऱ्या आघाडीची खलबतं सुरु असताना, या बैठकीकडे महत्वपूर्ण नजरेनं पाहिलं जात आहे. या बैठकीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस खासदार कुमार केतकर,  भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा,आणि आशिष देशमुखही उपस्थित होते.

या बैठकीबद्दल माहिती सांगताना आशिष देशमुख यांनी सांगितलं की, “बैठकीत अराजकीय मंचची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय, देशात आणि राज्यातील तरुणा आणि शेतकऱ्यांमध्ये आज जी भावना आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली”.

तर आगामी काळात कोल्हापूर, अकोला आणि मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात आंदोलन सुरु करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. हे आंदोलन 1 मे रोजी होणार असून, पुरोगामित्व वाचवा यासाठी भाजप वगळता सर्वपक्षीय एकत्र येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच, जनतेचच्या मनावर प्रभाव टाकणारी मीडिया, न्याय व्यवस्था, महत्त्वाच्या संस्था आदी सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. या विरोधात आगामी काळात मंचाकडून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचंही आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.