नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, कर्नाटकचे प्रभारी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्यासोबत सहप्रभारी म्हणूनही ठाकूर काम पाहणार आहेत.


यशोमती ठाकूर या अमरावतीतील तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आहेत. पेशाने वकील असणाऱ्या यशोमती ठाकूर या अत्यंत धडाडीच्या आमदार म्हणून मानल्या जातात. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्या अग्रभागी असतात.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संपूर्ण टीम बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक युवा चेहऱ्यांना ‘टीम राहुल’मध्ये संधी दिली जात आहे.

कालच महाराष्ट्रातील तरुण खासदार राजीव सातव यांची गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करुन, त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली. त्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांच्या रुपाने दुसऱ्या मराठी चेहऱ्याला राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधींनी नेले आहे. त्यामुळे आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्याकडील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.