नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर नव्यानेच लाँच करण्यात आलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटांची छपाई रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कारकिर्दीतच सुरू करण्यात आली होती. मात्र त्या नोटांवर रघुराम राजन यांच्या ऐवजी नवे गव्हर्नर उर्जीत पटेल यांची स्वाक्षरी मुद्रित करण्यात आली.


हिंदुस्थान टाईम्सने केलेल्या तपासणीनंतर ही वस्तुस्थिती पुढे आलीय. मात्र या माहितीला रिझर्व बँक किंवा माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यापैकी कुणीच काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर 9 तारखेला बँका बंद होत्या. दहा तारखेपासून बँकांमध्ये दोन हजारांच्या नव्या नोटा मिळायला सुरूवात झाली. त्यावेळी नव्यानेच चलनात आलेल्या नोटांवर नवे गव्हर्नर उर्जीत पटेल यांची स्वाक्षरी होती.

त्याचवेळी दोन हजारांच्या नोटा चलनात आल्यामुळे आणि जुन्या हजार पाचशेच्या नोटा रद्द झाल्यामुळे चलनी नोटांची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. देशभरात सगळीकडेच एटीएम आणि बँकांबाहेर मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या.

त्यानंतर सरकारचं आणि रिझर्व बँकाचं स्पष्टीकरण आलं की रिझर्व बँकेकडे पुरेशा नोटा आहेत. नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. तर सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की नोटा बंदीचा निर्णय अचानक घेतलेला नाही तर त्यासाठी पुरेशी पूर्वतयारी करण्यात आलीय. तब्बल सहा महिन्यांपासून या निर्णयावर विचारमंथन आणि पूर्वतयारी सुरू होती.

असं असतानाही तब्बल महिन्याभरापेक्षाही जास्त दिवस लोकांना नोटा टंचाईचा त्रास सहन करावा लागला.

त्यातूनच मग रिझर्व बँकेने दोन हजारांच्या नोटा छपाईला नेमकी कधी सुरूवात केली हा प्रश्न पुढे आला. मधल्या काळात मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना रिझर्व बँकेने आरटीआयमध्ये दिलेल्या माहितीमध्ये नोटाबंदीचा निर्णय झाला त्यावेळी रिझर्व बँकेकडे 500 रूपयांची एकही नवी नोट नव्हती तर दोन हजारांच्या नोटा छापून तयार होत्या.

त्यानंतर हिंदुस्थान टाईम्सने सखोल शोध घेतला तेव्हा, दोन हजारांच्या नव्या नोटांच्या छपाई प्रक्रियेला 22 ऑगस्ट रोजीच सुरूवात झाल्याची माहिती दोन करन्सी नोट प्रेसमधून मिळाली.

22 ऑगस्ट 2016 हा दिवस म्हणजे रिझर्व बँकेचे पुढील गव्हर्नर म्हणून उर्जीत पटेल यांचं नाव जाहीर झाल्यानंतरचा पहिला दिवस. पण तोपर्यंत मावळते गव्हर्नर रघुराम राजन यांचा कालावधी संपलेला नव्हता. रघुराम राजन 4 सप्टेंबरपर्यंत रिझर्व बँकेचे गव्हर्नर असणार होते.

22 ऑगस्टपासून दोन हजारांच्या नव्या नोटांच्या छपाईला सुरूवात झाली म्हणजे तेव्हा रघुराम राजन पदावर असतानाही त्यांची स्वाक्षरी नोटेवर का घेण्यात आली नाही, हिंदुस्थान टाईम्सने रिझर्व बँक तसंच रगुराम राजन यांच्याशी ईमेलमार्फत संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अजून काहीच उत्तर देण्यात आलेलं नाही.