नवी दिल्ली : आपण जर कठोर उपाययोजना केल्या तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवू शकतो, असे मत तिसरी लाट येण्याचा इशारा देणारे केंद्र सरकारचे वरीष्ठ वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी व्यक्त केलं आहे. विजय राघवन यांनी शुक्रवारी सांगितले की, जर आपण कठोर उपाययोजना केल्या तर तिसरी लाट सर्व ठिकाणी किंवा कुठेच येणार नाही.
तिसरी लाट थांबवू शकतो?
कोरोनाची तिसरी लाट ही राज्ये, जिल्हा, शहर आणि स्थानिक स्तरावर कशा प्रकारे कोरोना नियमांचे पालन केले जाते त्यावर अवलंबून आहे, असे राघवन म्हणाले. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ द्यायची की नाही हे आपल्याच हातात आहे.
यापूर्वी, बुधवारी वरिष्ठ वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी तिसऱ्या लाटेचा इशारा देत सांगितले होते की लाट नक्कीच येईल. ते म्हणाले होते की व्हायरसच्या संसर्गाची अनेक प्रकरणे आहेत, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्कीच येईल. म्हणून आपण नवीन लाटेची तयारी केली पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.
दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन स्ट्रेन समोर येत आहे. त्यामुळे लसीला अपडेट करणे आवश्यक जेणेकरुन या नवीन कोरोना स्ट्रेनशी ही लस मुकाबला करेल. आपण नवीन लाटेची तयारी केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, लस सुधारित करण्याबरोबरच नवीन स्ट्रेनवर लक्ष ठेवणंही आवश्यक आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव!
भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दररोज समोर येणारे कोरोनाबाधितांचे आकडे धडकी भरवणारे आहेत. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एवढंच नाहीतर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाचनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत.