नवी दिल्ली: गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या कानपूर रेल्वे दुर्घटनेमागे दहशतवादी हात होता का? अशी शंका अजून दाट होते आहे. कारण, या प्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एजंटला अटक केली गेली. शमशुल हुडा असं अटकेत घेण्यात आलेल्या एजंटचं नाव आहे. त्याला नेपाळमधून अटक करण्यात आलीय.

20 नोव्हेंबर 2016 ला कानपूरजवळच्या पोखरायाजवळ पटना-इंदूर एक्स्प्रेसचे 10 डबे घसरले होते. ज्यात 150 लोकांचा मृत्यू झाला. मात्र, रेल्वे रुळ सुरक्षित असताना हा अपघात घडलाच कसा? असा प्रश्न सातत्याने उपस्थीत केला जात होता.

आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती या दुर्घटनेमागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शंका बळावली आहे. सध्या भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि एनआयएकडून शमशुल हुडाची चौकशी सुरु आहे.

तसेच या प्रकरणी अजून तीनजाणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांची ओळखही पटली आहे. या तीन संशयितांमध्ये किशोर गिरी, आशिष सिंह आणि उमेश कुमार यांचा समावेश आहे. हे सर्वजण नेपाळच्या दक्षिण भागाचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, हुडा हा नेपाळच्या बारा जिल्ह्यातील हत्याकांडप्रकरणाचाही प्रमुख सूत्रधार आहे. तर बिहार पोलिसांनी सांगितले की, हुडासह ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांना हुडाच्या सहकाऱ्याने तीन लाख रुपये दिले.

पोलीस महासंचालक पशुपती उपाध्याय यांनी सांगितले की, ''हुडाचे आंतरराष्ट्रीय संघटनांशीही संबंध असून, तो नेपाळ आणि भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्याविरोधात बारा जिल्हा सत्र न्यायालयात याआधीच एक खटला सुरु आहे.''

बिहार पोलिसांनी जानेवारीमध्ये तीन आरोपींना अटक करुन, भारतीय रेल्वेला लक्ष्य करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे असल्याचा दावा केला होता. यासाठी ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनांना मदत करत होते. त्यामुळे कानपुर रेल्वे अपघातात आयएसआयची काय भूमिका होती, याचा तपास सुरु आहेत.