मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर नेटकऱ्यांनी हे व्हिडीओ अपलोड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचं सरकार असताना अनेक सभांमधून नरेंद्र मोदींनी दहशतवाद आणि नक्षलवादाच्या विरोधातील काँग्रेस सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला होता.

जुन्या व्हिडीओमध्ये मोदी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काही प्रश्न विचारताना दिसत आहेत. ते विचारतात, सीमा आणि सुरक्षाबल तुमच्याकडे असताना 'दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडे शस्त्रसाठा इतर देशातून येतो कसा? रिझर्व्ह बँकेसोबत सर्व व्यवहार तुमच्या आधिकाराखाली असताना दहशतवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा येतो कुठून? बीएसएफ, सैन्य, नेव्ही हे तुमच्या अधिकाराखाली येतात तर मग इतर देशातून दहशतवादी येतात कसे? असे प्रश्न मोदींनी त्यावेळी मनमोहन सिंह यांना विचारले होते.

नरेंद्र मोदींनी तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना विचारलेले प्रश्न आता नेटकरी त्यांना त्यांचाच व्हिडीओ शेअर करुन विचारत आहेत. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, असं मोदी एका मुलाखतीदरम्यान बोलतानाचा व्हिडीओही शेअर केला जात आहे. काँग्रेस सत्तेत असताना मोदी दहशतवाद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर जे प्रश्न उपस्थित करत होते. तेच प्रश्न आता नेटिझन्स त्यांना विचारत आहेत.