मुंबई : आजचा विजय ऐतिहासिक असून सबका साथ सबका विकास या भावनेचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) दिली. आज भारताच्या विकासाठी राज्यांचा विकास झाला पाहिजे या विचाराचा विजय झाला असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. तेलंगणात मात्र भाजपचा दारुण पराभव झालाय. यावर पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, तुमच्या घोषणा या तेलंगणापर्यंत पोहचल्या पाहिजेत.  पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल (State Assembly Election Results)  आज जाहीर झाला असून त्यापैकी तीन राज्यांवर भाजपने सत्ता मिळवल्याचं स्पष्ट झालंय. तर तेलंगणामध्ये केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने दहा वर्षांनंतर पुन्हा सत्ता हस्तगत केली आहे. मिझोराम राज्याचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. मिनी लोकसभा असं समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालंय.



तुमच्या घोषणा तेलंगणापर्यंत पोहचल्या पाहिजेत - पंतप्रधान मोदी


मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जरी भाजपाचा विजय झाला असला तरीही तेलंगणामध्ये भाजपाची पिछेहाट झालीये. यावर बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, तुमच्या या घोषणा तेलंगणापर्यंत पोहचल्या पाहिजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. मी तेलंगणामधील भाजप कार्यकर्त्यांचं विशेष आभार मानतो. मी तेलंगणाच्या जनतेला आश्वासित करतो की भाजप तुमच्या सेवेमध्ये कोणतीही कमी भासू देणार नाही, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. 


आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा विजय - पंतप्रधान मोदी 


हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेचा विजय आहे. त्यामुळे तुम्ही जी साथ आम्हाला दिली त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी तुम्हाला वचन देतो की विकासाची सगळी वचनं पूर्ण होतील आणि एका नव्या भारताची निर्मिती होईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


निवडणुकीच्या कालावधीमध्ये जातीयवाद करण्याचा प्रयत्न झाला - नरेंद्र मोदी


 या निवडणुकांमध्ये देशाला जातींमध्ये वाटण्याचे खूप प्रयत्न झाले. पण मी सातत्याने सांगत होतो की माझ्यासाठी देशात फक्त चार जाती आहेत. त्या म्हणजे नारीशक्ती, युवाशक्ती, शेतकरी आणि जवान. या चार जातींना सशक्त केलं तरच देश सशक्त होईल. आज प्रत्येक जातीचा माणून सांगत आहे, की हा आमचा विजय आहे.  असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 


देशाच्या नारी शक्तीचे आभार - पंतप्रधान मोदी 


आज मी विशेष करुन देशाच्या नारी शक्तीचे आभार मानू इच्छितो. आज ही नारी शक्ती म्हणतेय की प्रत्येक ठिकाणी भाजपा झेंडा फडकावेल. त्यामुळे आज नारी शक्तीकडून भाजपला जिंकवण्याचा निर्धार करण्यात आला होता. आज प्रत्येक मुलीला, बहिणीला स्पष्ट माहितीये की भाजपच सरकराच नारी शक्तीसाठई योग्य आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. 


काँग्रेसचा सुपडा साफ - पंतप्रधान मोदी 


काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांचा सुपडा साफ झालाय. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड यांसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट झालीये, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 


हेही वाचा : 


PM Modi : भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, हा विजय म्हणजे...