नवी दिल्ली: नोटाबंदीचा आज 47 वा दिवस असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासियांना कॅशलेसचे आवाहन केलं. पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात कॅशलेस भारत आणि भ्रष्टाचार मुक्त भारताचा नारा देताना, ''कॅशलेस व्यवहार करा, करोडपती व्हा'' या योजनेतून देशातल्या 15 हजार लोकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रत्येकी 1 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची माहिती दिली.
कॅशलेस भारतवर भर
'मन की बात' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आजच्या नाताळ सणाच्या शुभमुहुर्तावर देशवासियांना दोन नव्या योजनांचा लाभ मिळणार आहे. भारत सरकारच्यावतीने ग्राहकांसाठी आणि लहान व्यापाऱ्यांसाठी प्रोत्साहक योजना सुरु करण्यात येत असून, ग्राहकांसाठी 'लकी ग्राहक योजना', तर व्यापाऱ्यांसाठी 'डिगी धन योजना' सुरु करत असल्याचे सांगितले.
14 एप्रिल रोजी बंपर ड्रॉद्वारे कोट्यवधींची बक्षीसे
पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''सध्या देशात कॅशलेस पेमेंट आणि व्यवहारासाठी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. त्यामुळे आजपासून कॅशलेस व्यवहारांवर बक्षीस देण्याची योजना सुरु होणार असून, 15 हजार नागरिकांना शंभर दिवसांत रोज 1000 रुपयापर्यंतचे बक्षीस मिळेल.''
याशिवाय आजपासून जे कॅशलेस खरेदीचे व्यवहार सुरु करतील त्या ग्राहकांसाठी 14 एप्रिल रोजी बंपर ड्रॉ काढण्यात येईल. यामधून कोट्यवधीची लयलूट करता येईल. तसेच कॅशलेस माध्यमातून व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही बक्षीस देऊन सन्मानित करण्य़ात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कॅशलेस व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढला
पंतप्रधान म्हणाले की, ''ही योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून, गरिब आणि मध्यमवर्गातील लोकांना केंद्रस्थानी ठेऊन ही योजना बनवण्यात आली आहे.'' व्यापाऱ्यासाठीच्या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान म्हणाले की, ''डिगी धन व्यापार योजना ही मुख्य करुन व्यापाऱ्यांसाठी असून, गेल्या काही दिवसात कॅशलेस व्यवहारात 200 ते 300 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही,'' ते यावेळी म्हणाले.
जितका त्रास तुम्हाला होतो, तितकाच त्रास मलाही होतोय
''नोटाबंदीमुळे जितका त्रास तुम्हाला सहना करावा लागत आहे, तितकाच त्रास मलाही होता आहे. अनेकांनी अफवाह पसरवून जनतेला भूलवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही जनता त्याला बधली नाही. सध्या काहीजण अशी अफवाह पसरवत आहेत, ज्यामध्ये राजकीय पक्षांना अभय दिलं आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे.'' असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
काहीजण म्हणतात, मोदीजी तुम्ही थांबू नका!
पंतप्रधान म्हणाले की, ''काहीजण म्हणतात, मोदीजी तुम्ही थांबू नका! जितकी कडक पावले उचलता येतील तितकी उचला. मी अशा लोकांचे मनापासून आभार मानतो. कारण यातून जे जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत होते, अशा काहीजणांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.''
''नोटाबंदीनंतर राजरोस नवनवे लोक पकडले जात आहेत. ही माहिती मला जनतेतूनच मिळत आहे. पण हा पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे. ही लढाई आम्हाला जिंकायची आहे. ज्या निर्णयावर सव्वाशे कोटी जनतेचा विश्वास असले, त्यावरुन एक पाऊल मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे,'' ते म्हणाले.
देश अटलजींच्या योगदानाला कधीही विसरु शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहार वाजपेयी यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या 'मन की बात कार्यक्रमा'त अटलजींचा उल्लेख करुन देश अटलजींच्या योगदानाबद्दल त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांच्याच नेतृत्वखाली देश आण्विक संपन्न झाला. यामुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली.'' याची आठवण करुन दिली.
मदन मोहन मालवीय यांचेही स्मरण
पंतप्रधानांनी यावेळी मदन मोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करुन, भारतीय जनमानसात संकल्प आणि आत्मविश्वास जागृत करणाऱ्या मालवीयजींनी देशाला आधुनिक शिक्षणाची एक नवी दिशा दिल्याचे सांगितले.
संबंधित बातम्या
पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मधील महत्वाचे मुद्दे