नवी दिल्ली : आता तुम्ही देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भारतात (India) आणि परदेशात मिळालेल्या भेटवस्तूंना स्वत:च्या घरी घेऊन जाऊ शकता. कारण नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रसंगी मिळालेल्या भेटवस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.  या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या काही वर्षांत मिळालेले स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नॅशनल म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट किंवा नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स (NGMA) येथे  सोमवार (2 ऑक्टोबर) पासून या भेटवस्तूंचा लिलाव करण्यास सुरुवात झालीये. 


पंतप्रधान  मोदींनी सोशल मीडिया पोस्टवर माहिती दिली


स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'आजपासून NGMA दिल्लीत एक प्रदर्शन सुरू होत आहे ज्यामध्ये मला गेल्या काही वर्षांत दिलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हे प्रदर्शित ठेवण्यात येतील. भारतातील आणि भारताबाहेरील विविध कार्यक्रमांमध्ये मला देण्यात आलेल्या या भेटवस्तू भारताच्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि कलात्मक वारशाचा पुरावा आहेत.नेहमीप्रमाणेच त्यांचा लिलाव केला जाईल आणि त्यातून मिळणारी रक्कम नमामि गंगे प्रकल्पाला दान केली जाईल.'






कॅबिनेट मंत्री मीनाक्षी लेखी यांनी देखील दिली माहिती


याआधी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनीदेखील या प्रदर्शनाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'पंतप्रधानांना विविध प्रसंगी दिलेल्या स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा लिलाव आता सुरू करण्यात आलाय.  सर्वांना विनंती आहे की त्यांनी या ई-लिलावात सहभागी व्हावे आणि नमामि गंगे प्रकल्पात योगदान द्यावे.' 






जानेवारी 2019 पासून सुरु झाली लिलाव प्रक्रियेला सुरुवात


जानेवारी 2019 मध्ये, सरकारने पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सुमारे 1900 भेटवस्तूंचा लिलाव केला. या लिलावाद्वारे चित्रे, शिल्पे, शाली, पगडी, जॅकेट आणि पारंपारिक वाद्यांसह विविध देशांतील अनेक मौल्यवान भेटवस्तूंचीही विक्री करण्यात आली.