नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षातून शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधून बाहेर पडली आहे. याचा परिणाम आता एनडीएतील अन्य घटकपक्षांवर होत असलेला दिसून येत आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर घटकपक्षांची चिंता वाढली आहे. एनडीएतील मित्रपक्षांमध्ये संवाद कमी होत असल्याने त्याचा परिणाम युतीवर होण्याची शक्यता घटकपक्षांना वाटत आहे.


राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेत समसमान वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना राज्यातील युतीतून बाहेर पडली आहे. तर, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेना केंद्रातील एनडीए सरकारमधूनही बाहेर पडली. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्याने इतर घटकपक्षांची धाकधूक वाढली आहे.

एनडीएत संवाद वाढायला हवा -
बिहारमधील जेडीयूच्या एका नेत्याने एनडीएत संवाद कमी होत असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी चिंता व्यक्त केली आहे. याविषयी एबीपी न्यूजशी बोलताना चिराग पासवान म्हणाले, की जर कोणाला युतीमध्ये समन्वय कमी असल्याचे वाटत असेल, तर सर्वांनी त्याच्या तक्रारीचे निवारण करायला हवे. पुढे ते म्हणाले, की ज्याप्रमाणे अधिवेशनाच्या अगोदर युतीतील मित्रपक्षांची बैठक घेतली जाते. त्याप्रकारच्या बैठकी वाढवण्याची गरज आहे.

जेडीयूची समन्वय समिती तयार करण्याची मागणी
एनडीएतील मित्रपक्षांमध्ये संवादाची कमतरता जाणवत आहे, ती दूर करण्यासाठी पूर्वीसारखी समन्वय समिती तयार करण्याची गरज आहे, अशी माहिती जेडीयूचे प्रधान महासचिव सी त्यागी यांनी मंगळवारी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. राम मंदिर, तिेहेरी तलाक, एनआरसी आणि समान आचार संहिता सारख्या महत्वाच्या मुद्यांवरही मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली नाही. जे एनडीएसाठी चांगले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी एनडीएचे घोषणापत्र प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.

एनडीएच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, 18 नोव्हेंबर दिवशी सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी एनडीएची बैठक होणार आहे. यामध्ये युतीत समन्वय समिती तयार करण्याची मागणी घटकपक्ष करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळं शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. झारखंडमध्ये होणाऱ्या निवडणुकीतही एनडीएतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन एकवाक्यता झालेली नाही. त्यानंतर भाजप वगळता एनडीएतील अन्य मित्रपक्ष अशीच मागणी करत आहे.

संबंधित बातम्या -

नरेंद्र मोदींपासून सत्य का लपून ठेवले? अमित शाहांना संजय राऊतांचा सवाल

शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल : दिलीप लांडे

शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश; आता सत्तास्थापनेलाच परत येणार