Presidential Election 2022 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भाजपने आमच्याशी आधी चर्चा केली असती तर आम्ही देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असता. भाजपने एका आदिवासी महिलेला उमेदवारी देत ​​असल्याची माहिती दिली असती तर आम्ही पाठिंबा दिला असता. राष्ट्रपतीपदाची निवडणूक शांततेत पार पडावी अशी आमची इच्छा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.  


ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील इस्कॉन मंदिरात प्रार्थना केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले. मला वाईट वाटत आहे, पण द्रौपदी मुर्मू यांची स्थिती खूपच चांगली आहे. भाजपने चर्चा केली असती तर आम्हीही त्यांना पाठिंबा देऊ शकलो असतो, पण आता   विरोधक जे ठरवतील तेच मला करावे लागेल.   


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून रिंगणात आहेत. यशवंत सिन्हा यांचे नाव ममता बॅनर्जी यांनीच पुढे केले होते. यशवंत सिन्हा हे टीएमसीचे उपाध्यक्ष होते.  परंतु, राष्ट्रपती पदाच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 


एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू याा वैयक्तिकरित्या फोन करून या सर्वांसोबत बोलल्या होत्या. 


या पक्षांचाही मुर्मू यांना पाठिंबा



  • ओडिशाच्या बिजू जनता दलाने आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सनेही (MDA) पाठिंबा जाहीर केला आहे.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटलं आहे.

  • सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

  • बिहारच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चानेही पाठिंबा जाहीर केला आहे.

  • LJP (रामविलास) नेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.


महत्वाच्या बातम्या


Presidential Election 2022 : भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि निवडणुकीचे 'गुजरात कनेक्शन' 


President Election 2022: BSP च्या प्रमुख मायावती यांचा मोठा निर्णय, NDA उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिबा देणार