लखनौ : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. ओदिशातील आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीमुळे विरोधी पक्षात खळबळ उडाली आहे. त्यातच आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मायावती यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये घोषणा केली की, आम्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.


या निवडणुकीत यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. तर भाजपने आदिवासी कार्ड उघड केल्याने पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षही बुचकळ्यात पडले आहेत.


मायावतींनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. त्या म्हणाले की, "आम्ही हा निर्णय ना भाजपच्या बाजूने घेतला आहे ना एनडीएच्या बाजूने, ना विरोधकांच्या." "आमचा पक्ष आणि आंदोलन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे," असंही मायावतींनी स्पष्ट केलं.


महत्त्वाचं म्हणजे बसपा हा दलित चळवळीतून जन्माला आलेला पक्ष आहे. पक्षाची मूळ व्होट बँकही दलित आहे. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. अशा स्थितीत द्रौपदीने मुर्मूला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा द्यावा, या संभ्रमात बसपाही अडकला होता. अखेर द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं मायावती यांनी जाहीर केलं.


या पक्षांचाही मुर्मू यांना पाठिंबा



  • ओडिशाच्या बिजू जनता दलाने आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सनेही (MDA) पाठिंबा जाहीर केला आहे.

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटलं आहे.

  • सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे.

  • बिहारच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चानेही पाठिंबा जाहीर केला आहे.

  • LJP (रामविलास) नेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.


झारखंड मुक्ती मोर्चाही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शक्यता
दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाची (JMM) आज बैठक होणार आहे. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. JMM देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा करु शकते, असं म्हटलं जात आहे. JMM ची मूळ व्होट बँक देखील आदिवासी समुदायच आहे आणि NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देखील आदिवासी समाजातून आल्या आहेत. ओदिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने यापूर्वीच द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता.


एक दिवसआधीच उमेदवारी अर्ज दाखल 
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी एक दिवस आधी म्हणजेच 24 जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. द्रौपदी मुर्मू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही बोलून पाठिंबा मागितला आहे.


कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. त्या झारखंडच्या नवव्या राज्यापल देखील होत्या. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्या ओदिशाच्या पहिल्या नेत्या आहेत, ज्या राज्यपाल बनल्या आहेत. याआधी BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 पर्यंत त्या मंत्री देखील होत्या.


देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता
देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.


उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरची तारीख 29 जून
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी समाप्त होत आहे. पुढील महिन्यात देशाला नवीन राष्ट्रपती मिळेल. 15 जून रोजी नव्या राष्ट्रपतींच्या निवडची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 जून आहे. जर निवडणुकीची वेळ आलीच तर 18 जुलै रोजी निवडणूक होईल आणि 21 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.