नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं फुटण्याचा अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा खरा ठरला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची एकूण 22 मतं फुटली आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील 288 पैकी 287 आमदारांनी मतदान केलं होतं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे परदेशात असल्याने त्यांनी मतदान केलं नव्हतं.
महाराष्ट्रातील 287 आमदारांच्या मतांपैकी 208 मतं एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना, तर 77 मतं यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्या पारड्यात पडली. तर महाराष्ट्रातील 2 मतं बाद ठरली.
रामनाथ कोविंद यांना 208 मतं पडली, याचाच दुसरा अर्थ असा की, विरोधकांची एकूण 22 मतं फुटली आहेत. कारण भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांची मिळून 186 मतं होतात. मात्र, कोविंद यांना 208 मतं पडली. म्हणजेच विरोधकांमधून 22 मतं कोविंद यांच्या पारड्यात पडली.
अपक्ष आमदार रवी राणा यांनी याआधीच असा दावा केला होता की, राष्ट्रवादीचे 5 ते 6 आणि काँग्रेसचे 8 ते 9 आमदार राष्ट्रपती निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमदार रवी राणा यांचा दावा खरा ठरला आहे. किंबहुना, त्यापेक्षा अधिक मतं विरोधकांची फुटल्याचं आकडेवारीवरुन दिसून येते आहे.
रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती
देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.
रामनाथ कोविंद यांना 66 % म्हणजेच 7 लाख 2 हजार 44 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34 % म्हणजेच 3 लाख 67 हजार 314 मतं मिळाली.
रामनाथ कोविंद हे येत्या 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.
आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2017 05:52 PM (IST)
राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील विरोधकांची मतं फुटण्याचा अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा खरा ठरला आहे. महाराष्ट्रातील विरोधकांची एकूण 22 मतं फुटली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -