Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर आज, नवी दिल्लीमध्ये विरोधकांची बैठक सुरु झाली आहे. भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कांग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी देशातील विरोधी पक्षांना आमंत्रित केले होते. ममता बॅनर्जी यांच्या हाकेला प्रतिसाद देत तब्बल 17 विरोधी पक्षांनी हजेरी लावली आहे. 


कोण कोण राहिले उपस्थितीत - 
ममता बॅनर्जी यांनी बोलवल्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रफुल्ल पटेल, शिवसेनाकडून प्रियंका चतुर्वेदी, 'वाम'चे दीपांकर भट्टाचार्य, आरजेडीचे मनोज झा, पीडीपीकडून महबूबा मुफ्ती, नेशनल कॉन्फ्रेंसचे फारूक अब्दुल्ला, कांग्रेसकडून रणदीप सुरजेवाला  मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश, सपाकडून अखिलेश यादव, आरएलडीचे जयंत चौधरी आणि डीएमकेचे टी आर बालू उपस्थित आहेत.  


कुणी मारली दांडी? - 
के चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष, अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी, बसपा, वाईएसआर काँग्रेस, बीजेडी आणि अकाली दलकडून या बैठकीला कुणीही आले नाही. या पक्षांनी विरोधकांच्या बैठकीला दांडी मारली.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पार्टी (बीएसपी) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआईएमआईएम) यासारख्या काही पक्षांना या बैठकीचं आमंत्रण नव्हते. आमंत्रण असताना न आलेल्या पक्षाममध्ये टीआरएस , बीजेडी , आम आदमी पार्टी आणि अकाली दल यांचा समावेश आहे. 


बैठकीत काय होणार?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसाप, या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदाराच्या काही नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या नावावर विचार करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात येईल. याचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अथवा एखाद्या सिनिअर नेत्यांकडे देण्यात येऊ शकते.


एनडीएकडे आघाडी -  
आकड्याचं गणित पाहाता सत्ताधारी एनडीएकडे आघाडी आहे. त्यात जर बीजद, ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कषगम (अन्नाद्रमुक) आणि युवजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (वाईएसआरसीपी) यासारख्या पक्षाचं समर्थन मिळाल तर एनडीएच्या उमेदरावाचा विजय निश्चित मानला जातोय.  सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्ताधारी एनडीए राष्ट्रपदी पदासाठी उमेदवाराची चाचपणी करत आहेत.  


राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान
पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे.