Presidential Election 2022 : देशात राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवार निवडीवरून चर्चा, बैठकांना सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र, त्यांनी उमेदवारीला नकार दिला. सत्ताधारी गोटातही उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे काही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 11 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणाचे अर्ज दाखल


1. डॉ. के. पद्मराजन, सीलम, तामिळनाडू
2. जीवन कुमार मित्तल, दिल्ली
3. मोहम्मद ए हामिद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
4. सायरा बानो मोहम्मद पटेल, मुंबई, महाराष्ट्र
5. टी. रमेश, नमक्कल, तामिळनाडू
6. श्याम नंदन प्रसाद, मोकामा, बिहार
7. प्रा. दयाशंकर अग्रवाल, दिल्ली
8. ओम प्रकाश खरबंदा, दिल्ली
9. लालू प्रसाद यादव, बिहार
10. ए. मणिथन, तामिळनाडू
11. डॉ. मंदती तिरुपती रेड्डी, आंध्र प्रदेश


या उमेदवारांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र हे सगळे उमेदवार हौशी उमेदवार आहेत. यातील लालू प्रसाद यादव हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील एका उमेदवाराचे नाव लिम्का बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. 


तामिळनाडूमधील डॉ. के. पद्मराजन हे होमिओपॅथिक डॉक्टर असून व्यावसायिक आहेत. त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. मात्र, हे नाव 'सर्वाधिक अपयशी' उमेदवार म्हणून नोंदवण्यात आले आहे. 


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एका दाम्पत्याने अर्ज दाखल केला आहे.  मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने याआधीदेखील 2017 मध्ये निवडणूक अर्ज दाखल केला होता. यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे. 


दिल्लीतून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यात उद्योगपती जीवन कुमार मित्तल यांच्या नावाचा समावेश आहे. जीवन कुमार मित्तल यांनी आतापर्यंत राष्ट्रपतींना 5000 हून अधिक पत्रे लिहिली आहेत. याच कारणामुळे ते प्रसिद्धही आहेत. वर्ष 2012 आणि 2017 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. आता तिसऱ्यांदा ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 


बुधवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या 11 उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. 


छाननीमध्ये या सर्वांचे अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला सूचक आणि अनुमोदक म्हणून प्रत्येकी 50 आमदार, खासदारांची स्वाक्षरी हवी असते.