नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं. राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्याबद्दलच्या सरकारच्या निर्णयाचंही स्वागत केलं. सरकारच्या या निर्णयाचा जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात तीन तलाक विरोधातील कायद्याचा देखील उल्लेख केला. तीन तलाकसारखा श्राप संपल्याने देशातील आपल्या मुलींना न्याय मिळेल आणि त्यांना भयमुक्त जीवन जगण्याची संधी मिळेल, असं राष्ट्रपतींना सांगितलं.


जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनाही देशातील इतर नागरिकांप्रमाणे अधिकार मिळणार आहेत. याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. विविध योजनांचा त्यांना लाभ घेता येईल. माहितीचा अधिकार मिळाल्याने जम्मू काश्मीरमधील नागरिकांना आता लोकांच्या हिताची माहिती मिळवणे शक्य होणार आहे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं.



संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात झालेल्या कामाची राष्ट्रपतींना प्रशंसा केली. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सदनात पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. सर्वच पक्षांचं सहकार्य, एकमेकांसोबतच्या समन्वयामुळे अनेक विधेयकं यंदाच्या अधिवेशनात मंजूर झाले. येणाऱ्या पाच वर्षात दोन्ही सभागहात असंच काम व्हावं. राज्यातील विधानसभांमध्येही अशारीतीने प्रभावी कार्यपद्धतीचा अवलंब व्हावा, अशी आशा राष्ट्रपतींना व्यक्त केली.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकाऱ्यांना विसरुन चालणार नाही. त्यांचं देशाच्या स्वातंत्र्यात मोठं योगदान आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. देशातील सामान्य नागरिकांनी देशाच्या विकासात योगदान देण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करणे गरजेचं आहे. देशाचे जवान आणि इतर सुरक्षा यंत्रणा देशाची कायदा सुव्यवस्था राखण्याचं आणि देशाच्या संरक्षणाचं काम करतात आणि देशप्रेमाचं प्रदर्शन करतात, असा राष्ट्रपती म्हणाले.