Ram Nath Kovind Farewell : मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज संसदेच्या वतीने निरोप देण्यात आला. निरोप समारंभ राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यावेळी उपस्थित होते.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संबोधित केले आणि त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत निरोप घेतला. निरोप देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, "मला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी देशातील नागरिकांचा सदैव ऋणी राहीन."
"पाच वर्षांपूर्वी मी येथील सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सर्व खासदारांसाठी माझ्या हृदयात विशेष स्थान आहे असें सांगत कोरोनाविरुद्ध विक्रमी लसीकरण केल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक केले. आपल्या निरोपाच्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.
रामनाथ कोविंद यांनी 2017 मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. रामनाथ कोविंद हे एनडीएचे उमेदवार होते आणि त्यांनी यूपीएच्या उमेदवार आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांचा पराभव केला होता. राष्ट्रपती होण्यापूर्वी रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते. शिवाय ते राज्यसभेचे खासदारही होते.
दरम्यान, द्रौपदी मुर्मू या 25 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.