भारताच्या राष्ट्रपतींनीही देशवासीयांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा अधर्मावर धर्माचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजयाचा आहे. आनंद आणि उत्साहाचा हा सण कोरोनाच्या महामारीच्या प्रभावापासून सर्वांची रक्षा करेल आणि सर्वांच्या जीवनात सुख आणि समृध्दी आणेल अशी आशा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनीही दसऱ्यानिमित्त देशवासीयांना दिलेल्या शुभेच्छात म्हटले आहे की हा सण भारतीयांच्या जीवनात शांती, सद्भाव आणि समृध्दी आणेल. आप्तस्वकीयांची भेट व्हावी यासाठी सण साजरा केला जातो. परंतु कोरोनाची जागतिक महामारी लक्षात घेता या वर्षी सर्व नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करून पारंपरिक पध्दतीने दसरा साजरा करावा असे आवाहन त्यांनी केलं आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे की शेवटी विजय हा सत्याचा होतो.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवारांनी देशवासीयांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की विजायदशमीला शस्त्रांची पूजा होते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हीच कोरोनाशी लढण्यासाठी आपली महत्त्वाची अस्त्रे आहेत. त्यांच्या वापर करूया आणि कोरोनारूपी शत्रूवर विजय मिळवूया.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की विजयादशमीचा महापर्व मनुष्याला अधर्म, अहंकार आणि असत्याचा त्याग करायला लावते आणि त्याला धर्म, विवेक आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे पर्व आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सिक्कीमच्या नथुला क्षेत्रात जाऊन भारतीय सेनेच्या जवानांची भेट घेतली आहे आणि तिथेच त्यांनी शस्त्रपूजा केली आहे. या सणाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना म्हटले आहे की दसऱ्याच्या निमित्तानं आपणा सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी, अशा शुभेच्छा! दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदानं, उत्साहानं, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरा करूया!
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की हा सण म्हणजे अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व अशा प्रकारचा आहे.
आपल्या 40 वर्षांच्या कालावधीत भाजपचा विस्तार करायचं काम करणारे आणि नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी, अस्मिता जपण्यासाठी सिमोल्लंघन करूया.
राष्ट्रवादी पक्षाचे युवा आमदार रोहित पवारांनीही या प्रसंगी देशावर आणि राज्यावर आलेल्या वेगवेगळ्या संकटांना पराभूत करूया असे म्हणत जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.