Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाची निवडणूक आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आज दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. 


निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मतांसाठी देशातील सर्व राज्यांचा दौरा करू शकतात. खासदार आणि विधानसभेचे आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा अधिक संख्या आहे. त्यामुळे एनडीएचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 50 टक्के मतदान एनडीएचे उमदेवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला होता. 


राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे निकष काय?


राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निकष आहेत. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा भारतीय नागरीक असावा आणि त्याचे वय 35हून अधिक असावे. त्याशिवाय, त्याला किमान 100 आमदार, खासदारांचा पाठिंबा असावा. यामध्ये 50 सूचक आणि 50 अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करतात. हे आमदार, खासदार थेट निवडून आलेले प्रतिनिधी असावेत. एका उमेदवाराला अधिकाधिक चार नामांकने दाखल करता येतात. 


मागील चार टर्मपासून उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती झालेच नाहीत


उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदी निवडण्याची एक अप्रत्यक्ष परंपरा रुजली होती. मात्र, मागील चार टर्मपासून उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीपदी नियुक्त झाले नाहीत.  भाजपचे कृष्णकांत आणि भैरो सिंह शेखावत हे उपराष्ट्रपती होते. मात्र, त्यांना राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली नाही. त्यांच्याऐवजी एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली. तर, दोन वेळेस उपराष्ट्रपती राहिलेल्या हामिद अन्सारी हे दोन वेळेस उपराष्ट्रपती झाले होते. मात्र, त्यांनाही राष्ट्रपतीपदासाठी संधी मिळाली नाही.