मुंबई : रेल्वेच्या प्रिमियम तात्काळ तिकीटांसाठी प्रवाशांच्या उड्या पडत असतात. याचवेळी रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. प्रिमियम तात्काळ तिकीटं आता आरक्षण खिडकी अर्थातच रिझर्व्हेशन विंडोवर विक्रीस उपलब्ध होणार आहेत.
आतापर्यंत ही तिकीटं फक्त आयआरसीटीसीचं लॉगइन असलेल्या प्रवाशांना ऑनलाईन उपलब्ध होती. त्यामुळे दलालांची संख्या वाढत होती, मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे यापुढे ही प्रिमियम तिकीटं रिझर्व्हेशन विंडोवरही उपलब्ध असतील आणि तिकीटाच्या काळाबाजाराला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 26 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रिमियम तात्काळ कोट्यातील बुकिंग वाढलं होतं. आता शाळा सुरु झाल्या असल्या तरी आगामी काळात प्रवाशांना दिलासा मिळेल. रेल्वेकडून 2014 मध्ये प्रिमियम तात्काळ योजना सुरु करण्यात आली. या कोट्यानुसार ट्रेनचा चार्ट तयार होण्यापूर्वी प्रवासी तिकीट काढू शकतात. तात्काळ तिकीटांच्या तुलनेत प्रिमियम तात्काळचे दर 50 टक्क्यांहून जास्त असतात.
प्रिमियम तात्काळ तिकीटाचे नियम काय?
तात्काळ कोट्यातील 50 टक्के जागा डायनॅमिक तिकीटदर पद्धतीनुसार कन्फर्म दिली जातात. डायनॅमिक तिकीटदर म्हणजे जसजशा सीट्स कमी होत जातील, तसतसे आरक्षण दर वाढत जातात. कन्फर्म तिकीटासाठी प्रवाशांनी दराच्या 50 ते 100 टक्के ( दीडपट ते दुप्पट) अतिरिक्त शुल्क द्यावं लागतं.
प्रिमियम तात्काळचं ऑनलाईन बुकिंग सकाळी 8 वाजता सुरु होतं आणि ट्रेनचा चार्ट लागेपर्यंत बुकिंग केलं जातं.