हैदराबादः भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच वायु सेनेचं विमान महिला पायलट उडवणार आहे. तीन महिला पायलट प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपवून 18 जूनला फायटर प्लेन उडवण्यास सज्ज होत आहेत.

 

हैदराबादच्या इंडियन एअर फोर्स अकॅडमीतून भावना कंठ, अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंह या तीन प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपवून भारतीय वायू सेनेच्या सेवेत सज्ज होत आहेत. वायू सेनेचं विमान उडवण्याऱ्या या पहिल्याच महिला ठरणार आहेत.

 

'ऐतिहासिक संधीचं सोनं करणार'

तिन्हीही महिला प्रशिक्षणार्थींनी आपली स्वप्नं बोलून दाखवली. या मिळालेल्या ऐतिहासिक संधीबद्दल अभिमान असल्याचं सांगत त्यांनी देशाची सेवा करणार असल्याचं सांगितलं.

 

प्रशिक्षण संपताच ही मोठी संधी मिळत आहे. चांगली महिला लढाऊ पायलट होऊन देशाला आणि माझ्या आई वडिलांना अभिमान वाटेल असं काम मी करेलं, असं भावना कंठ यांनी सांगितलं. प्रशिक्षणाच्या काळात अभ्यासक्रमामध्ये अनेक चांगले अनुभव आले. वेगवेगळ्या अनुभवातून आत्मविश्वास चांगला वाढला आहे. त्यामुळे देशासाठी नक्कीच चांगलं काम करीन, असं भावना यांनी सांगितलं.

 



 

 

प्रत्येक क्षणातून काही तरी शिकत रहायचं आहे, आणि देशासाठी चांगलं योगदान द्यायचं आहे, अशी भावना अवनी चतुर्वेदी यांनी बोलून दाखवली. करीअरच्या सुरुवातीलाच ही मोठी संधी मिळत आहे, त्यामुळे या संधीचं सोनं करुन महान पायलट बनणार असल्याचं चतुर्वेदी यांनी सांगितलं.

 

तिसरी प्रशिक्षणार्थी मोहना सिंह यांनी प्रशिक्षणादरम्यानचे अनेक किस्से बोलून दाखविले. वायू सेनेची पायलट झाल्यामुळे माझ्या आई वडिलांना अभिमान आहे. देशासाठी योगदान द्यायचं आहे, असं मोहना सिंह यांनी सांगितलं. मोहना सिंह यांनी प्रशिक्षणादरम्यानचा नाईट फ्लाईंगचा किस्सा आठवणीने सांगितला.