भोपाळ : मध्य प्रदेशमधील कटनी येथील एका गर्भवती महिलेने गरिबीला कंटाळून आत्महत्या केली आहे. या महिलेने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केली. परंतु फासावर लटकलेल्या अवस्थेतच या महिलेची प्रसुती झाली. नवजात बाळ या महिलेच्या पायांमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले. या बाळाची प्रकृती स्वस्थ आहे.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपनिरिक्षक कविता साहनी यांनी याबाबत सांगितले की, "कटनी न्यू जंक्शन पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणाऱ्या संतोष ठाकूर यांची पत्नी लक्ष्मी हीने घरातील पंख्याला लटकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. गुरुवारी सकाळी संतोषने त्याच्या पत्नीला घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टरलादेखील बोलावले. डॉक्टरांनी बाळाची गर्भनाळ कापून रुग्णालयात दाखल केले."
संतोष हा शेतमजूर आहे. त्यामुळे त्यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे हे पाचवे बाळ आहे. गरीब परिस्थितीमुळे ती महिला तिच्या मुलांना सांभाळू शकत नव्हती. त्यामुळे ती निराशेच्या छायेत वावरत होती. अखेर तिने गुरुवारी आयुष्य संपवून घेतले.