नवी दिल्ली : श्रीरामभक्त हनुमानाला मुस्लीम, दलित, आदिवासी, जाट, जैन, ब्राह्मण , वंचित ठरवल्यानंतर आता हनुमानजी चिनी होते, असा जावईशोध भाजपचे खासदार किर्ती आझाद यांनी लावला आहे. भाजपाचे बंडखोर खासदार किर्ती आझाद यांनी हनुमान चिनी होता. चीनच्या लोकांकडूनही हा दावा कायम केला जातो, त्यामुळे ते चिनी होते असे म्हटले आहे. किर्ती आझाद हे माजी क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडू आहेत.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान दलित होते, असे म्हटले होते. तेव्हापासून हा सगळा वाद सुरु झाला होता, तेव्हापासून हनुमानाच्या जातीवरून आणि धर्मावरून चर्चा होते आहे. परवाच भगवान हनुमान हे मुस्लीम असल्याचा दावा उत्तरप्रदेशातील भाजप आमदाराने केला आहे. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

याआधीही भाजपाच्या आमदारांनी आणि खासदारांनी हनुमानाला जाती धर्मात अडकवले आहे. आता भाजपचे  नेते किर्ती आझाद यांनी हनुमानाचे राष्ट्रच बदलले आहे. हे सगळे करून या नेत्यांना नेमके काय साधायचे आहे याचे उत्तर अजून तरी जनतेला मिळालेले नाही.

केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी हनुमानाला आर्य जातीचे महापुरुष म्हटले होते. योगी सरकारमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी हनुमानाला जाट संबोधले होते. आचार्य निर्भय सागर यांनी हनुमानाला जैन म्हटले होते.  तर भाजप खासदार हरिओम पांडे यांनी हनुमानाला ब्राह्मण असल्याचे संबोधले होते.

बजरंगबली मुसलमान होते: भाजप आमदार
भगवान हनुमान अर्थात बजरंगबली हे दलित, वंचित असल्याचे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. मात्र भगवान हनुमान हे मुस्लीम असल्याचा दावा नुकताच उत्तरप्रदेशातील भाजप आमदाराने केला होता. भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हनुमान हे मुस्लीम होते म्हणूनच मुसलमानांची नावे ही रहमान, रमजान, फरमान, झीशान, कुर्बान अशी ठेवली जातात. ती त्यांच्या नावावरच ठेवली जातात, असे त्यांनी म्हटले. आमदार बुक्कल नवाब यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.