नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणावरुन सध्या युपीएससी (UPSC) बोर्डावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. युपीएससीसारख्या परीक्षांमध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारे अधिकारी नियुक्त केले जात असतील, तर सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिकावे का नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, आता युपीएससी बोर्डाच्या चेअरमनपदी एका डॅशिंग महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 29 जुलै रोजी आयएएस (IAS) अधिकारी प्रीति सूदन यांच्याकडे युपीएससी बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रीति सूदन गुरुवार 1 ऑगस्ट रोजी आयोगाच्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कर्नाटक कॅडरच्या 1983 सालच्या आयएएस अधिकारी असलेल्या प्रीति सूदन (Priti Sudan) यांचा कार्यकाळ एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. 


प्रीति सूदन ह्या कर्नाटक कॅडरच्या आयएएस अधिकारी असून हरयाणाच्या रहिवाशी आहेत. विशेष म्हणजे 1983 सालच्या बॅचच्या अधिकारी राहिलेल्या सूदन 4 वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्या आहेत. आपल्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या अनेक विभागात त्यांनी डॅशिंग कामगिरी केलीय. केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्रालयातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावली आहे. त्यासह, संरक्षण मंत्रालयाच्या सचिव, खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग, आरोग्य विभागाच्या सचिवपदीही त्यांनी पदभार स्वीकारला होता. सन ऑक्टोबर 2017 ते जुलै 2020 यांनी कोविड 19 च्या महामारीत रणनीतीकार म्हणून महत्वाची भूमिका बजावली आहे. 


प्रीति सूदन यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली असून एमए, एमफील आणि पीएचडी इकॉनॉमिक्स विषयात केली आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ, आयुष्यमान भारत योजना यांसह राष्ट्रीय आरोग्य आयोग, एलाईड हेल्थ प्रोफेशनल आयोग आणि ई-सिगारेटवर प्रतिबंधन कायद्या बनवण्याचं क्रेटीड प्रीति सूदन यांना दिलं जातं. युपीएससीची प्रमुख बनणाऱ्या प्रीति सूदन ह्या दुसऱ्या महिला आहेत, युपीएससीचे अध्यक्ष महेश सोनी यांनी अचानक आपला राजीनामा दिल्यानंतर प्रीति सूदन यांना पदोन्नती देत युपीएससीच्या अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे. महेश सोनी यांनी व्यक्तिगत कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


IAS पूजा खेडकर वादात


दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पूजा खेडकरी यांची नियुक्ती झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांच्या प्रमाणपत्रांची बोगसगिरी समोर आल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मसुरी येथील आयएएस प्रशिक्षण केंद्राने त्यांना परत बोलावले आहे. मात्र, अद्यापही पूजा खेडकर यांनी मसुरीत हजेरी लावली असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. दुसरीकडे पूजा खेडकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.