COVID-19 Vaccine Booster Dose : देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त असणाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती. 10 जानेवारीपासून बूस्टर डोसची सुरुवात होणार आहे. याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. यावर निती आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 


ज्या लसीचे दोन डोस घेतेले असतील तीच लस बूस्टर डोससाठी असेल. ज्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले असतील त्यांना तिसरा डोसही कोव्हॅक्सिनचा दिला जाईल. ज्यांनी कोव्हिशील्डचे दोन डोस घेतले असतील, त्यांना कोव्हिशील्ड दिली जाईल, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी बुधवारी स्पष्ट केलं.  बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मिस्क डोसबाबतच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला. 


भारतामध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्या पार्श्वूभूमीवरच भारतात बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 15 ते 18 या वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरु झाले आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 2200 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 900 रग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे, अन्य रुग्णावर उपचार सुरु आहेत. 24 राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, राजस्थान आणि तामिळनाडू याराज्यात सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित रुग्ण आहेत.  






ओमायक्रॉनमुळे भारतात पहिला मृत्यू
Omicron variant : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट अधिक धोकादायक नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार राज्यस्थानमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला आहे. 


देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; 58 हजारांहून अधिक रुग्ण
देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसचे 58 हजार 97 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2135 रुग्ण समोर आले आहेत. जाणून घ्या देशाची कोरोनाची सध्याची स्थिती...  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून दोन लाख 14 हजार 4 वर पोहोचली आहे. या महामारीत जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 82 हजार 551 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (मंगळवारी) 15 हजार 389 रुग्ण ठिक झाले आहेत. आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.