चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल 15 ते 20 मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द केला. आता यावरुन देशातील राजकारण चांगलंच तापलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब सरकारला यावरुन जाब विचारल्यानंतर त्याला काँग्रेसने उत्तर दिलं आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यामागे निदर्शकांचे कारण नसून मोदींच्या सभेतील मोकळ्या खुर्च्या आहेत असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी 10 हजार सुरक्षाकर्मी तैनात होते. या दौऱ्यासाठी सर्व व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली होती. पण पंतप्रधानांनी त्यांच्या दौऱ्यातील मार्गामध्ये बदल केला. पंतप्रधानांचा ताफा अडवला ते निदर्शक किसान मजदूर संघर्ष कमिटीचे होते. या संघटनेने कृषी कायद्यावरुन केंद्र सरकारसोबत दोनवेळा चर्चा केली होती."
रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले की, "किसान मजदूर संघर्ष कमिटी आणि शेतकऱ्यांनी मोदींच्या विरोधात आंदोलन का केलं? अजय मिश्रा टेनी यांना मंत्रिपदावरुन दूर करावं, आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे, आंदोलनात मृत पावलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, एमएसपी वर लवकरच निर्णय घ्यावा या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. पण मोदी सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे."
शेवटी पंतप्रधानांची ही रॅली रद्द करण्यामागे हे निदर्शकांचं कारण नव्हते तर त्यांच्या सभेसाठी गर्दी न जमणे, खुर्च्या रिकाम्या असणे हे आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यामुळे भाजपने हा ब्लेम गेम थांबवावा आणि शेतकरी विरोधी धोरणांची चिकिस्ता करावी असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबमधली सभा सुरक्षेतल्या उणीवांमुळे रद्द करण्याची वेळ आली. आज फिरोजपूरमध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पोहचणार होते. पण निदर्शकांनी रस्ता अडवल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिटे अडकला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha