चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा पंजाब दौरा रद्द करावा लागल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यामध्ये सुरक्षेची कोणतीही त्रुटी नव्हती, पण दौरा रद्द करण्याचा निर्णय शेवटच्या क्षणी घेण्यात आला असं सांगत त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. 


मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले की, "पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरचा दौरा नियोजित होता. पण अखेरच्या क्षणी त्यांनी गाडीने जाण्याचं नियोजन केलं. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात 70 हजार खुर्च्या होत्या. पण केवळ 700 लोकच उपस्थित होते."


पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबमधली सभा सुरक्षेतल्या उणीवांमुळे रद्द करण्याची वेळ आली. आज फिरोजपूरमध्ये पंतप्रधान वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी पोहचणार होते. पण निदर्शकांनी रस्ता अडवल्यामुळे पंतप्रधानांचा ताफा जवळपास 15 ते 20 मिनिटे अडकला होता. यावर यानंतर भटिंडा एअरपोर्टवरुन दिल्लीला जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एअरपोर्ट अधिकाऱ्यांकडे एक संदेश दिला. तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 


केंद्रीय गृहमंत्रालयाने झापलं
दरम्यान, आज घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारला खरमरीत पत्रही लिहिलंय. या प्रकाराची तात्काळ चौकशी करुन यात कुठे उणीवा झाल्या, कोण दोषी याचा तात्काळ अहवाल द्या असंही बजावण्यात आलंय. 


रिकाम्या खुर्च्यांमुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द; काँग्रेसचा आरोप
पंतप्रधानांची ही रॅली रद्द करण्यामागे हे निदर्शकांचं कारण नव्हते तर त्यांच्या सभेसाठी गर्दी न जमणे, खुर्च्या रिकाम्या असणे हे आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. त्यामुळे भाजपने हा ब्लेम गेम थांबवावा आणि शेतकरी विरोधी धोरणांची चिकिस्ता करावी असंही ते म्हणाले. 


पंजाबमधल्या या घटनेनंतर आता राजकारणही जोरात सुरु झालंय. पंजाबमधे काँग्रेसचे चरणजितसिंह चन्नी हे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानांचा ताफा येणार हे माहिती असूनही त्याच रस्त्यावर निदर्शकांनाही पोहचू दिलं असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलाय. तोडग्यासाठी प्रयत्न चालू असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांनी फोनही उचलला नाही असा आरोप त्यांनी केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नियोजित कार्यक्रम निदर्शनांमुळे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता या घटनेनंतर राजकारणही कसं वळण घेतंय हे पाहावं लागेल. 


महत्त्वाच्या बातम्या :