मुंबई : डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह गोत्यात येण्याची चिन्हं आहेत. डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणारं भाषण सत्यपाल यांनी मागे घ्यावं, अशी मागणी केली जात असून त्यांच्या विरोधात वैज्ञानिकांनी ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे.
'डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे. माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असं वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमधल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये शुक्रवारी केलं होतं.
आपण किंवा आपल्या पूर्वजांपैकी कोणीही जंगलात वानरांपासून मानवाची उत्क्रांती होताना पाहिल्याचं लिहून ठेवलेलं किंवा सांगितलेलं नाही. आपण लहानपणी वाचलेल्या पुस्तकात, बालकथेत किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतही याचा उल्लेख नाही, असं सत्यपाल सिंह म्हणाले होते.
जेव्हापासून माणूस भूतलावर आला आहे, माणूसच होता आणि माणूसच राहील. परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी 35 वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सांगितलं आहे, असाही दावा सिंह यांनी केला.
सत्यपाल सिंह यांच्या भाषणाचा तीव्र विरोध करत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरु केली. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुलं पत्र लिहिण्यात आलं असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.
सत्यपाल सिंह यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलं आहे. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील बागपतमधून भाजपच्या तिकीटावर ते खासदारपदी निवडून आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती राज्यमंत्रिपदी करण्यात आली.
सत्यपाल यांनी यापूर्वी केलेल्या काही वक्तव्यांमुळे वादंग माजला होता. ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांनी दादरी हत्याकांडाला लहानशी घटना संबोधलं होतं.
राईट बंधूंच्या आठ वर्ष आधी शिवकर तळपदे या भारतीयाने पहिल्यांदा विमानाचा शोध लावला, हे भारतीय विद्यार्थ्यांना शिकवायला हवं, असंही सत्यपाल सिंह गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणाले होते.
लग्नाच्या मंडपात जीन्स घालून येणाऱ्या तरुणीशी कोणताही मुलगा लग्न करायला तयार होणार नाही, असं वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी गेल्या महिन्यात केलं होतं.
डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणाऱ्या सत्यपाल सिंहांना विरोध
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jan 2018 11:04 AM (IST)
परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी 35 वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सांगितलं आहे, असा दावा सत्यपाल सिंह यांनी केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -