'गेल्या काही दिवसात झालेल्या घटनांमुळे मी प्रचंड दुखावलो आहे. त्यामुळे आम्ही कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहोत. जर 12 वर्षाखालील बालिकेवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं, तर दोषीला सर्वोच्च शिक्षा सुनावण्यात यावी, असा कायदा आम्ही करणार आहोत.' असं खट्टर शनिवारी म्हणाले.
'घटना पडताळून पाहिल्याशिवाय जी सनसनी केली जाते, ती होता कामा नये' असंही मत खट्टर यांनी व्यक्त केलं. या शिक्षेची तरतूद असणारं विधेयक लवकरच विधानसभेत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
धक्कादायक म्हणजे हरियाणात गेल्या आठवड्याभरात बलात्काराच्या 9 घटनांची नोंद झाली आहे. यापैकी तीन घटना गुरुवारी घडल्या.
सातवीत शिकणाऱ्या एका दलित विद्यार्थिनीला घराबाहेरुन पकडून चौघांनी तिच्यावर चाकूच्या धाकाने बलात्कार केला. 20 वर्षीय तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याचं समोर आलं, तर बीए सेंकड इयरच्या विद्यार्थिनीवर चालत्या गाडीत दोघांनी गँगरेप केला होता.
यापूर्वी, मध्य प्रदेश सरकारने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्याचं विधेयक मंजूर केलं होतं.