नवी दिल्ली: 'पार्ले'ने त्यांच्या दोन जाहिरातींमधील 'गूड डे' च्या बिस्किटांसारख्या दिसणाऱ्या चित्राला ब्लर करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. पार्लेच्या या जाहिरातीमध्ये दिसणारे कुकीज हे ब्रिटानियाच्या गुड डे बिस्किटांसारखे दिसत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 


दोन आठवड्यांच्या आत पार्लेने त्यांच्या संबंधित दोन जाहिरातींमध्ये सुधारणा केली आहे याची खात्री करावी. जेणेकरुण 1 मे 2022 पासून कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील या जाहिरातींमध्ये गुड डे बिस्किटांसारखे चित्र दिसणार नाही, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाच्या सिंगल बेंचचे न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंग यांनी दिले आहेत. 


ब्रिटानिया कंपनीने पार्ले कंपनीच्या या नव्या डिझाईनबद्दल कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि पार्लेकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या संबंधी सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. ब्रिटानियाची ही तक्रार पार्ले जी कंपनीच्या 20-20 कुकीजच्या तीन जाहिरातीच्या संबंधीत आहे. 


मार्चमध्ये, पार्लेने त्यांच्या एका जाहिरातीमधील पॅकेजिंग आणि कुकीजसंबंधित डिझाइन बदलण्यास सहमती दर्शविली होती. या तक्रारीमध्ये असं निदर्शनास आणलं आहे की उर्वरित दोन जाहिरातींमध्ये पॅकेजिंगचा कोणताही मुद्दा नाही परंतु कुकीजचं डिझाईन एकसारखं आहे.


यावर उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की, पार्लेने  आजपासून दोन आठवड्यांच्या आत या दोन जाहिरातींमधील चित्रं ब्लर करावीत आणि 1 मे 2022 पासून कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सध्या वापरात असलेल्या बिस्किटाचे चित्र कुठेही दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी.