नवी दिल्ली : बिहार निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात असताना एक चेहरा मात्र या सगळ्यातून गायब आहे. तो म्हणजे राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर. काही दिवसांपूर्वी ज्यांना बिहारच्या राजकारणातला उगवता तारा म्हणून पाहिलं जात होतं, ते प्रशांत किशोर या निवडणुकीत कुठेच सक्रीय दिसत नाहीयेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपसाठी काम केलं होतं. पण ते खऱ्या अर्थानं देशपातळीवर चर्चेत आले ते 2015 च्या बिहार निवडणुकीनं. त्यावेळी नितीश, लालू यादव आणि काँग्रेस असं एकत्र महागठबंधन करुन भाजपला रोखण्यात प्रशांत किशोर यांचा वाटा होता.


त्यानंतर प्रशांत किशोर आणि नितीशकुमार यांच्यात समीकरणं अगदी 180 डिग्रीत बदलली आहेत. नितीशकुमार हे लालू यादव यांची साथ सोडून भाजपसोबत गेले. 2018 मधे प्रशांत किशोर यांना जेडीयूत अधिकृत प्रवेश देऊन राष्ट्रीय उपाध्यक्षही बनवण्यात आलं होतं. पण नंतर अवघ्या काही काळातच त्यांचे संबंध इतके बिघडले की त्यांना पक्षातून काढण्यात आलं. नागरिकत्व कायद्यावरुन प्रशांत किशोर यांनी घेतलेली थेट विरोधाची भूमिका हा त्यातला कळीचा मुद्दा होता. नितीशकुमार या मुद्द्यावर भाजपला साथ देत असताना दुसरीकडे प्रशांत किशोर मात्र जाहीरपणे भाजपवर टीका करत होते.


बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छितायत?


जेडीयूतून बाहेर पडल्यावर प्रशांत किशोर स्वताचा राजकीय पक्ष काढणार का याचीही काही दिवस चर्चा होती. यावर्षी फेब्रुवारीतच त्यांनी बात बिहार की नावानं एक संवाद अभियान सुरु केलं होतं. पण नंतर त्याचं काही राजकीय रुपांतर होताना दिसलं नाही. प्रशांत किशोर स्वत: बिहारचे आहेत, मात्र आपल्या राज्यात निवडणूक होत असताना ते कुठेच नाहीत. त्यामुळे त्यांचं हे अचानक गायब होणं हे सहज आहे की या अलिप्ततेमागे काही सुनियोजित रणनीती आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


लोकसंख्येनुसारच मिळायला हवं आरक्षण, ऐन निवडणुकीत नितीशकुमारांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य


विशेष म्हणजे प्रशांत किशोर बिहारमध्ये सगळं राजकीय घमासान सुरु असताना कुठल्याच मुद्द्यावर व्यक्तही होत नाहीयेत. एरव्ही ट्विटरवरच महत्वाच्या भूमिका मांडणाऱ्या प्रशांत किशोर यांचं शेवटचं ट्वीट 20 जुलै 2020 चं आहे. त्यानंतर गेल्या साडेतीन महिन्यांत त्यांनी एकही ट्वीट केललं नाहीय. त्यामुळे प्रशांत किशोर गप्प राहून नेमकी कुणाला मदत करत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रशांत किशोर यांनी आत्तापर्यंत अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांसाठी निवडणूक अभियान आखलेलं आहे. सध्या ते 2021 च्या सुरुवातीला होणाऱ्या पश्चिम बंगाल निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत आहेत. शिवाय त्यानंतर होणाऱ्या तामिळनाडू निवडणुकीत ते एम के स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षासोबतही काम करत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांपुर्वीही त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांची भेट घेतलेली होती.