नवी दिल्ली : व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेला दिल्लीचा 'बाबा का ढाबा'ची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांचा व्हिडीओ बनवणाऱ्या गौरव वासनने फसवणूक केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला आहे. या तक्रारीनुसार, लोकांनी कांता प्रसाद यांना लाखो रुपयांची आर्थिक मदत केली होती, त्यामध्ये अफरातफर झाली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी मोठ्या संख्येने लोक समोर आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मदतीसाठी जे पैसे जमा झाले होते, त्यात गौरव वासनने अफरातफर केली आहे, असा कांता प्रसाद यांचा आरोप आहे.





यू ट्यूबर गौरव वासनवर कोणते आरोप?
गौरव वासन यू ट्यूबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बादामी देवी रडत आपलं दु:ख सांगताना दिसत होते. जगभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे त्यांचं उत्पन्न 100 रुपयांपेक्षा कमी होतं, असं कांता प्रसाद या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहेत. त्यांची ही व्यथा यू-ट्यूबर गौरव वासनने कॅमेऱ्यात कैद करुन आपल्या चॅनलवर अपलोड केला होता आणि या वृद्ध दाम्पत्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बाबा का ढाबामध्ये एकच गर्दी झाली होती. दाम्पत्याला पैसे ट्रान्सफर करुन मदत करण्याची व्यवस्थाही झाली. परंतु गौरव वासनने यातच अफरातफर केल्याचा आरोप कांता प्रसाद यांनी केला. त्यांच्या माहितीनुसार, गौरवने जाणीवपूर्वक केवळ त्याचा आणि कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती शेअर करुन मोठी रक्कम जमा केली. तसंच गौरवने त्यांना कोणत्याही व्यवहाराची माहिती दिली नाही.


गौरव वासनने आरोप फेटाळले
दुसरीकडे गौरव वासनने सर्व आरोप फेटाळले आहेत. सर्व रक्कम कांता प्रसाद यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केला होता, असा त्याने सांगितलं. मी जेव्हा हा व्हिडीओ बनवला होता, तेव्हा मला माहित नव्हतं की या व्हिडीओचा एवढा मोठा परिणाम होईल. बाबांना त्रास होऊ नये यासाठी मी माझ्या बँक खात्याची माहिती दिली, असंही तो म्हणाला. वासनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो बँक खात्याची माहिती दाखवताना दिसत आहे. त्याने फेसबुक पेजवर बँक स्टेटमेंट अपलोड करण्याचा दावा केला आहे.








अफरातफर केल्याचं आढळल्यास कारवाई होणार : पोलीस
आता बाबा का ढाबाचे मालक कांता प्रसाद यांनी मालवीयनगर पोलीस स्टेशनमध्ये गौरव वासनविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. आम्हाला तक्रार मिळाली असून तपास सुरु आहे, अशी माहिती दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल ठाकूर यांनी दिली आहे. कांता प्रसाद यांना आर्थिक मदत करण्याच्या प्रकरणात कोणी अफरातफ केल्याचं समोर आलं तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.


Real Story of Delhi's BABA KA DHABHA 'बाबा का ढाबा'च्या व्हिडीओची खरी कहाणी, पाहा सोशल मीडियाची कमाल