नवी दिल्ली: देशातील सर्वात कठीण समजली जाणारी आणि बुद्धिमत्तेचा अक्षरश: कस पाहणारी स्पर्धा परीक्षा यूपीएससीचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थींनी प्रांजली पाटील हिने घवघवीत यश प्राप्त केलं आहे. आपल्या अंधत्वावर मात करीत प्रांजलीनं कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवलं.


 

मंजिल उन्ही को मिलती है, जिनके सपनों में जान होती है

पंखो से कुछ नही होता, उडान तो हौसलों से होती है...

 

प्रांजलीची कहाणी ऐकल्यानंतर ही कविता जणू काही तिच्यासाठी आहे असं वाटतं. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी प्रांजली दृष्टी गमावून बसली. नियतीनं केलेल्या अन्यायाचा बाऊ न करता ती या परिस्थितीला धैर्यानं सामोरी गेली. तिच्या या प्रवासात तिला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. पण तरीही तिनं न डगमगता या सगळ्यावर मात केली आणि उल्हासनगर ते दिल्ली हा प्रवास यशस्वीपणे पार केला. तिनं यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केलं.

 

26 वर्षीय प्रांजली मूळची महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील. सुरुवातीचं शिक्षण तिचं ब्रेल लिपीमध्ये झालं. त्यानंतर तिनं मुंबईतील सेंट झेवियर्समध्ये प्रवेश घेऊन राज्यशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एमएसाठी प्रवेश घेतला. त्याचवेळी तिनं यूपीएससीचीही तयारी सुरु केली. यात तिनं 773वा क्रमांक पटकावला आहे.

 

सामान्य विद्यार्थ्यांना अभ्यास करणं तसं फार सोपं असतं. पण प्रांजलीसाठी ही गोष्ट तेवढी सोपी नव्हती. पुस्तकांपर्यंत पोहचण्याचा प्रवास तिचा फारच कष्टप्रद होता.

 

प्रशासनात येऊन नागरिकांसाठी काम करणं हा तिचा हेतू आहे. प्रांजली अजूनही जेएनयूमध्ये शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबत ती कॅम्पसमधील सामाजिक कामांमध्येही सहभागी असते.

 

अतिशय सामान्य कुटुंबातून प्राजलं आलेली आहे. पण आपलं अंधत्व तिनं कधीच्या यशाच्या मध्ये येऊ दिलं नाही. कठोर मेहनत, जिद्द याच्या जोरावर तिनं मैलाचा दगड गाठला आहे. मात्र, अजूनही तिचा यशाचा प्रवास संपलेला नाही. तर तो आता नुकताच सुरु झाला आहे.