नवी दिल्ली : भारताचा नामवंत पैलवान सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिकच्या तिकीटासाठी कोर्टाची पायरी चढणार असल्याचं वृत्त आहे.


 

 

2008 आणि 2012 सालच्या लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमारने 66 किलो वजनी गटात अनुक्रमे कांस्य आणि रौप्य अशी दोन पदकांची कमाई केली होती. त्यानंतर 2014 सालच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत तो 74 किलो वजनी गटाचा सुवर्णपदक विजेता ठरला होता. पण त्यानंतर गेली दोन वर्षे सुशील कुमार खांद्याच्या दुखापतीमुळं स्पर्धात्मक कुस्ती खेळला नव्हता.

 

 

या कालावधीत 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणारा नरसिंह यादव रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लास वेगासमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करुन त्याने रिओ ऑलिम्पिकचा कोटा मिळवला. आता रिओ ऑलिम्पिक तीन महिन्यांवर आलेलं असताना सुशील कुमारने त्याची आणि नरसिंह यादवची चाचणी कुस्ती खेळवण्याची मागणी केली आहे.

 

 

सदर कुस्ती जिंकणारा पैलवान रिओ ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करेल असा हेका सुशील कुमारने धरला आहे. त्यासाठी त्याने भारतीय कुस्ती फेडरेशनला पत्र लिहिलं आहेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून सुशील कुमारने भेट देण्याचीही विनंती केली आहे.

 

 

भारतीय कुस्ती फेडरेशनने चाचणी कुस्तीची आपली मागणी मान्य न केल्यास सुशील कुमारने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरु केली आहे.