नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नाही. रुग्णालयाने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितलं आहे की, "प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खालावली असून फुफ्फुसांमध्ये इफेक्शनची प्राथमिक लक्षणे दिसत आहेत. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे.





84 वर्षीय प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी दिल्ली छावणीच्या सैन्य रुग्णालयात दाखल केलं होतं. मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शिवाय त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता.


स्वत: प्रणव मुखर्जी यांनी 10 ऑगस्ट रोजी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. त्यांनी लिहिलं होतं की, "वेगळ्या वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आलो होतो. इथे कोरोनाची चाचणी केला असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना विनंती आहे की, त्यांनी आयसोलेट व्हावं आणि कोरोना चाचणी करावी."





तज्ज्ञांच्या पथकाच्या देखरेखीखाली माजी राष्ट्रपती
दिल्ली छावणी परिसरातील आर्मी रिसर्च अँड रेफरल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, "तज्ज्ञांचं पथक माजी राष्ट्रपतींच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत." प्रणव मुखर्जी यांच्या आरोग्याबाबत रुग्णालयाकडून दररोज मेडिकल बुलेटिन जारी करुन माहिती दिली जात आहे. काल (18 ऑगस्ट) रुग्णालयाने सांगितलं की, प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. ते अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.