पणजी : सोमवारी पहाटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सकाळी परवरी सचिवालयात येऊन मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला. मनोहर पर्रिकर यांचे राज्यात सुरु असलेले प्रकल्प पूर्ण करणार असून तळागाळातील लोकांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहू, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामास सुरूवात केली.

दरम्यान, उद्या आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करणार असून आम्ही निर्विवाद ते सिद्ध करु, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. सभापतीपदाचा राजीनामा देऊन सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने उद्या होणाऱ्या अधिवेशनासाठी विद्यमान उपसभापती असलेले मायकल लोबो हंगामी सभापती म्हणून काम पाहणार आहेत,अशी माहितीही सावंत यांनी दिली.

घटक पक्षांना सोबत घेऊन उर्वरित 3 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करु असा विश्वास व्यक्त करून सावंत म्हणाले, मनोहर पर्रिकर हे उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांच्याएवढे काम करता येणार नाही. मात्र त्यांना अपेक्षित असलेले काम नक्की करणार आहे.

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी दोनापावला येथील मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी जाऊन पर्रिकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पर्रिकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचे आशीर्वाद घेतले.

महालक्ष्मी मंदिरातून मुख्यमंत्री सावंत थेट सचिवालय गाठून मुख्यमंत्री कार्यालयाचा ताबा घेतला. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या खुर्ची शेजारी दुसऱ्या खुर्चीवर मनोहर पर्रिकर यांची प्रतिमा ठेवून त्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या कामास सुरुवात केली.

प्रशासनाला सक्रिय करून विकास कामे मार्गी लावण्याला आपले प्राधान्य असणार असून त्यासाठी आता पासूनच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन काम सुरु केले असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत असे आहे पक्षीय बलाबल
भाजप 12
गोवा फॉरवर्ड 3
मगो 3
अपक्ष 3
राष्ट्रवादी काँग्रेस 1
काँग्रेस 14

मनोहर पर्रिकर आणि फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाल्याने पणजी आणि म्हापसा येथील जागा रिक्त झाल्या आहेत. त्याशिवाय शिरोडा आणि मांद्रे मतदार संघाच्या आमदारांनी आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आणखी 2 जागा रिक्त आहेत. 40 आमदारांच्या विधानसभेत 36 आमदार असून बहुमतासाठी 19 आमदारांची गरज भासणार आहे.