प्रमोद सावंत गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी, पर्रिकरांच्या निधनानंतर काही तासातच शपथविधी
एबीपी माझा वेब टीम | 18 Mar 2019 08:08 PM (IST)
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर सभापती प्रमोद सावंत बसतील हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोव्याचे सभापती प्रमोद सावंत विराजमान होणार आहेत. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आजच होणार आहे. प्रमोद सावंत यांना रात्री 11 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोन आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भारतीय जनता पक्ष तयार आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय आणीबाणीच्या परिस्थितीत भाजपने घटक पक्षांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेचप्रसंग अखेर संपला आहे.