लखनौ : मला एक शेतकरी म्हणाला की, चौकीदार फक्त श्रीमंतांकडे असतो. आम्ही शेतकरी तर स्वतःच स्वतःचे चौकीदार आहोत, असे सांगून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेवर टीका केली आहे. आज वाराणसी येथे प्रियांका गांधींची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत प्रियांका बोलत होत्या.


प्रियांका म्हणाल्या की, "त्यांच्या (नरेंद्र मोदी)मर्जीने ते स्वतःच्या नावापुढे काहीही लावतील. मला एक शेतकरी भाऊ भेटला, तो म्हणाला की, चौकीदार फक्त श्रीमंतांकडे असतो. आम्ही शेतकरी तर स्वतःच स्वतःचे चौकीदार आहोत." पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वाराणसी येथे प्रियांका यांनी आज (सोमवारी)सभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. त्या सध्या तीन दिवसीय यात्रेवर आहेत. आज प्रयागराजमधून त्यांची या यात्रेला सुरुवात झाली आहे. प्रयागराजमधील स्थानिक नेत्यांच्या बैठकीनंतर प्रियांका गांधी या नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात (वाराणसी)दाखल झाल्या.