पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजता राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना राजभवनात मुख्यमंत्रीपदाच शपथ दिली. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते तसेच आरएसएसचेही निकटवर्तीय मानले जातात.


प्रमोद सावंत आपल्या साधेपणासाठी परिचित आहेत. सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई या दोन आमदारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


याशिवाय भाजप, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. गोवा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंत सध्याचे उपाध्यक्ष मायकल लोबे हे अध्यपदाची धुरा सांभाळतील.


मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय आणीबाणीच्या परिस्थितीत निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेला राजकीय पेचप्रसंग अखेर संपला आहे.



कोण आहेत प्रमोद सावंत?


डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु आता त्यांना थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे.


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी 63 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना असा परिवार आहे. पर्रिकरांच्या पार्थिवावर सोमवारी मिरामार बीचवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. पर्रिकरांच्या निधनामुळे गोव्यासह देशभरात शोकाकूल वातावरण आहे.