जम्मू : काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ पाकिस्तानी सैन्याने आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. पाकिस्तानी सैन्याने राजौरीजवळच्या बट्टल परिसरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत केलेल्या फायरींगमध्ये भारताचा एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी दिवसभरात पाकिस्तानने 100 पेक्षा जास्तवेळा फायरींग केली आहे.

पाकिस्तानने केलेल्या फायरींगमध्ये भारतीय जवान करमजीत सिंह (24)हे जबर जखमी झाले होते. जखमी करमजीत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान करमजीत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. करमजीत सिंह पंजाबमधील लुधियानाजवळच्या मोघा तालुक्यातील जनेर गावचे रहिवासी होते.


संरक्षण खात्याचे प्रवक्ते देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, सकाळी 5.30 वाजता पाकिस्तानने फायरींग सुरु केली. भारतानेदेखील त्याला प्रत्युत्तर दिले. सकाळी 7.15 वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी फायरींग सुरु होती. परंतु भारताने प्रतिकार वाढवल्यानंतर पाकिस्तानकडून फायरींग थांबवण्यात आली.