Tirupati Laddu Controversy : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून बनवल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर देशभरात खळबळ उडाली. तिरुपती मंदिरासाठी तयार करण्यात आलेल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात आला होता. देशव्यापी वाद वाढत चालल्यानंतर सिंघम फेम अभिनेते प्रकाश राज यांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. प्रकाश राज यांनी आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी घेतलेल्या भूमिकेवर खोचक टोला लगावला आहे. 






प्रकाश राज यांनी X वर पोस्ट करताना पवन कल्याण यांचे एक ट्विट शेअर केले असून ते सरकारमध्ये असताना हे प्रकरण कसे घडले असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी लिहिले की, 'प्रिय पवन कल्याण, तुम्ही उपमुख्यमंत्री असलेल्या राज्यात हे घडले आहे. कृपया तपासा. दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करा.


आपल्या देशात आधीच खूप जातीय तणाव  


प्रकाश राज पुढे म्हणाले की, 'तुम्ही भीती का पसरवत आहात आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर का मांडत आहात? आपल्या देशात आधीच खूप जातीय तणाव आहे (केंद्रातील तुमच्या मित्रांचे आभार). आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी भेसळयुक्त प्रसादाच्या लाडूच्या मुद्द्यावर पोस्ट टाकून चिंता व्यक्त केली होती.


TTD बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील


पवन कल्याण यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, 'तिरुपती बालाजी प्रसादमधील भेसळयुक्त प्राण्यांच्या चरबीच्या (फिश ऑइल, डुकराचे मांस आणि गोमांस फॅट) च्या परिणामांमुळे आपण सर्वजण खूप त्रस्त आहोत. YCP सरकारने स्थापन केलेल्या TTD बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. आमचे सरकार शक्य तितकी कठोर कारवाई करण्यास कटिबद्ध आहे. परंतु मंदिरांच्या अपवित्रीकरणाशी संबंधित अनेक प्रकरणे, त्यांच्या जमिनीच्या समस्या आणि इतर धार्मिक प्रथा यावर प्रकाश टाकतात.


'सनातन धर्माचा अपमान संपवण्यासाठी...'


आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पुढे लिहितात की, 'भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 'सनातन धर्म रक्षा मंडळ' स्थापन करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय पातळीवर सर्व धोरणकर्ते, धर्मप्रमुख, न्यायव्यवस्था, नागरिक, प्रसारमाध्यमे आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात वादविवाद व्हायला हवेत. सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान संपवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मला वाटते.


इतर महत्वाच्या बातम्या